लालसा माझिये मनाला । लागली लालसा । नीच अवदसा । छळतसे ॥ १॥ अजाण बालक । काल होतो जेंव्हा । मनी नसे हेवा । कुणाप्रती ॥ २॥ नसे मुखी माझ्या । कधीच कुवाचा । कामना सर्वांच्या । शुभ होत्या॥ ३॥ वय हे वाढले । वाढली मनिषा । अवगत भाषा । स्वार्थासाठी ॥ ४॥ डावपेच सारे । कट कारस्थाने । शिकलो नेमाने । तरबेज ॥ ५॥ आप्तजणं सारे । लुटत सुटलो । कधी मी लुटलो । कळले ना ॥ ६॥ घट्ट चिटकली । मनाला लालसा । सोडवू मी कसा । सांगा मला ॥७॥ दिनेश अ .कांबळे औरंगाबाद