Nojoto: Largest Storytelling Platform

संपूर्ण कथा शांतीपूर गाव आपल्या नावा प्रमाणे शांत

संपूर्ण कथा

शांतीपूर गाव आपल्या नावा प्रमाणे शांततेत नांदत होते . पण एक दिवस असे काही घडले ज्यामुळे गावातील शांतता नाहीशी झाली . त्या गावात  एक तांत्रीक आला होता आणि तो सरपंचाच्या घरात  सापडला.

तो लोकांना सांगत होता " मी त्या घरात असलेल्या एका दृष्ट आत्म्याला पकडण्यासाठी आत गेलो होतो . " पण लोकांना वाटले तो ढोंगी आहे आणि चोरी करण्यासाठी सरपंचाच्या घरी गेला असावा म्हणून गावातील लोकांनी त्याला मारहाण केली .  त्याने परत लोकांना विनंती केली " मला त्या आत्म्याला कैद करण्यासाठी मदत करा नाहीतर ती आत्मा गावातच भटकत राहणार आणि इतरांना त्रास देणार . "

 लोकांनी तर अगोदरच त्याला ढोंगी ठरवला होता मग त्याच्या सांगण्यावर लोक कसे विश्वास ठेवणार होते . लोकांनी त्याचे ऐकले नाही आणि त्याला हाकलून लावला .

त्याच रात्री गावातील एक माणुस सिगरेट ओढत होता तेव्हा त्याच्या जवळ एक अनोळखी माणूस  आला आणि म्हणाला " शंकरराव मला पण एक सिगरेट दे ना "

" कोण आपण ? आणि मला कसेकाय ओळखतात मी तर तुम्हाला या आधी कधी पाहिला पण नाही . " शंकररावाने उलट प्रश्न केला .

"माझे नाव शामराव मी आता याच गावात राहणार . " त्याने उत्तर दिले .

" पण तुम्ही मला कसे ओळखतात ? " शंकररावाने परत प्रश्न केला .

" मी या गावातील सर्व लोकांना ओळखतो . गावात राहणार म्हटल्यावर सगळ्या गावकऱ्यांची ओळख असायलाच पाहिजे नाही का? " शामराव शांतपणे म्हणाला .

" हो ते बरोबरच आहे म्हणा तुमचं पण राहणार कुठे तुम्ही ? " 

" ते पिंपळाचे झाड दिसते ना तिथेच राहणार . " असे म्हणत तो शंकररावाच्या हातातील सिगरेट घेऊन पिंपळाच्या झाडाकडे जाऊ लागला .

शंकरराव त्याला बघतच राहिला . बघता बघता तो त्या पिंपळाच्या झाडावर चढु लागला . शंकरराव त्याचे  हे वागणे बघून थोडा घाबरला पण त्याचे लक्ष अजूनही शामरावाच्या हालचालींवर खिळून होते . शंकरराव त्याला बघत होता तेवढ्यात मागुन कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला . शंकरावाने  वळून पाहिले तर मागे शामराव हातात विडी घेऊन उभा होता .

शंकररावाचे लक्ष परत पिंपळाच्या झाडावर गेले तर तिथे कोणीच नव्हता . शंकरराव आता मात्र खुपच घाबरला . तो थरथरत्या पावलांनी पळू लागला . त्याच्या मागे शामराव धावत होता . शामराव जोराने ओरडत होता . " शंकरराव सिगरेट तर दिली आता लाइटर कोण देणार " .

शंकरराव एकदाचा पळत पळत आपल्या घरी पोहचला . त्याला अशा अवस्थेत पाहुन घरचेही चिंतीत झाले . त्याने घडलेला प्रकार सर्वाना सांगितला .

त्या रात्री त्याला झोपच लागत नव्हती . परत परत शामरावाचा चेहरा त्याच्या डोळ्यांपुढे येत होता . त्याची नजर खिडकीवर पडली तिथे त्याला कोणाची तरी सावळी दिसत होती . त्याची खिडकी जवळ जाण्याची हिंमत होत नव्हती . शेवटी तो देवाचे नाव घेत घेत खिडकी जवळ गेला आणि खिडकी उघडली बाहेर शामराव हातात सिगरेट घेऊन उभा होता . शंकररावाला बघताच तो म्हणाला " शंकरराव लाइटर द्या ना लाइटर " . शंकरराव जागीच कोसळला .

दुसर्‍या दिवशी त्याने घडलेला सगळा प्रकार गावात सांगितला . तेव्हा गावातील आणखीन काही लोकांनी त्या रात्री त्यांच्या सोबत घडलेले वाईट अनुभव सांगितले .
 तो सगळ्या लोकांकडे लाइटर मागत होता.

गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते . लोकांना तांत्रीकाला मारल्याचा पश्चाताप होऊ लागला . त्यांना आता खात्री पटली होती कि तो तांत्रीक खरोखर सरपंचाच्या घरात आत्म्याला पकडण्यासाठी आला होता . लोकांना वाटत होते कदाचीत ती आत्मा शामरावाची असावी आणि तांत्रीकाने सांगितल्या प्रमाणे आता त्याची आत्मा गावात भटकत असून सर्वांना त्रास देत आहे.

लोकांनी त्या तांत्रीकाला शोधून परत गावात आणण्याचे ठरवले ...

लोकांनी त्या तांत्रीकाला शोधण्याची मोहिम सुरु केली . लोकांनी खुप शोधाशोध केली शेवरी तो एका शेजारच्या गावात त्यांना सापडला . सर्वात अगोदर लोकांनी त्याची क्षमा मागितली आणि गावात घडलेल्या सगळ्या घटना त्याला सांगितल्या आणि लोक त्याला  आपल्या गावात घेऊन गेले .

लोकांनी तांत्रीकाला त्या आत्म्या बद्यल विचारले .

तांत्रीकाने एक लांब श्वास घेतला आणि सांगायला सुरवात केली " शामराव आणि भीमराव हे दोघे भाऊ होते . त्यांचे वडिल एक तांत्रीक होते आणि आपली विद्या त्याने आपल्या दोघा मुलांना शिकवली होती .  वडिलांच्या मृत्युनंतर भीमराव व्यसनाच्या आहारी गेला . तो आपल्या मित्रांसोबत सिगरेट आणि दारू पिण्यात वेळ वाया घालवायचा .

दुसरीकडे शामराव आपल्या तांत्रीक विद्येत भर घालत होता . तो गावोगावी फिरून भटकत असलेल्या आत्म्यांना एका लाइटर मधे बंद करायचा आणि एका  विशिष्ट ठिकाणी नेऊन त्यांना आपल्या मंत्राद्वारे मोक्ष प्राप्ती करण्यास मदत करायचा .

एक दिवस शामराव कुठेतरी बाहेर गेला होता म्हणून भीमरावाने  पार्टी करण्यासाठी त्याच्या घरी मित्रांना बोलवले होते . मित्र आल्यावर भीमराव दारू आणायला बाहेर  गेला होता . त्याचे मित्र सिगरेट पेटवण्यासाठी लाइटर शोधू लागले . लाइटर शोधता शोधता ते शामरावाच्या खोलीत गेले . तिथे त्यांना एक लाइटर मिळाला . पण खुप प्रयत्न करून सुद्धा तो लाइटर पेटत नव्हता . लाइटर पेटत नाही म्हणून रागाने त्यांनी तो जोरात जमिनीवर आपटला . लाइटरचे दोन तुकडे झाले तेवढ्यात तिथे भीमराम आला आणि जोराने ओरडला  " हे काय केले तुम्ही , हा साधासुधा लाइटर नव्हता या लाइटर मध्ये एक दृष्ट आत्मा कैद होती . आता आपले काही खरे नाही . चला पळा इथून "

भीमराव आपल्या मित्रांसोबत बाहेर गेला . त्या रात्री भीमराव आपल्या भावाच्या भीतीने घरी गेलाच नाही . दुसऱ्या दिवशी सकाळी भीमराव घरी गेला घराचा दरवाजा उघडाच होता . तो आत गेला तर  त्याचा भाऊ जमिनीवर मृत पडलेला होता . तो मोठ्याने रडू लागला पण आता रडून काय फायदा त्याच्या चुकीमुळे त्याने आपल्या भावाला गमावला होता . भावाच्या मृत्युने त्याच्या मनावर खुप मोठा परिणाम झाला . त्याने ठरवले या पुढे दारू आणि सिगरेटला हात सुद्धा लावायचा नाही . 

त्याने आपले सगळे लक्ष तांत्रिक विद्येकडे केंद्रीत केले . खुप दिवस कठोर परिश्रम केल्यावर आता तो सुद्धा आत्म्यांना कैद करण्याच्या विद्येत निपूर्ण झाला . पण त्याच्या समोर आता खुप मोठे संकट उभे होते . गावातील लोकांना शामरावाची आत्मा दिसत होती . लोकांकडे त्याची आत्मा सिगरेट आणि लाइटर मागत होती .

भीमरावाने खुप प्रयत्नाने शामरावाच्या आत्माला एका लाइटर मधे कैद केले . दुसऱ्या दिवशी तो शामरावाच्या आत्म्याला मुक्त करणार होता . पण तो लाइटर कुठे तरी हरवला . 

कदाचीत तो लाइटर कोणीतरी तुमच्या गावात आणला आहे आणि त्या लाइटर मधे असलेल्या शामरावाच्या आतम्याला नकळत बाहेर काढले आहे . जो पर्यंत त्याचा आत्मा त्या लाइटर मधे कैद होत नाही तो पर्यंत तो या गावात भटकत राहणार .
शामरावाला  फक्त त्याचा भाऊच कैद करू शकतो पण त्यासाठी अगोदर तो लाइटर शोधावा लागणार . "

" लाइटर तर आम्ही शोधू शकतो पण भीमराव कुठे मिळणार आम्हाला ? " लोकांनी त्या तांत्रीकाला प्रश्न केला .

" तुम्ही फक्त लाइटर शोधा भीमराव इथेच आहे " . 

तांत्रीकचे बोलणे ऐकून लोक सर्वत्र बघत म्हणाले " इथे ? पण इथे तर कोणीच दिसत नाही . कुठे आहे भीमराव ? "

" तुमच्या समोर . होय मीच आहे भीमराव . त्या दिवशी मी त्या लाइटरच्या शोधात सरपंचाच्या घरात गेलो होतो .  त्या दिवशी जर तुम्ही माझे ऐकले असते तर आज तुमच्यावर ही वेळ आलीच नसती . त्याच दिवशी मी त्याला कैद केला असता . अजुनही वेळ गेलेली नाही लवकरात लवकर तो लाइटर शोधा नाहीतर अनर्थ होईल"

लाइटर शोधण्यासाठी लोकांना जास्त त्रास झाला नाही ,लाइटर सरपंचाच्या घरीच सापडला . लाइटर हातात घेऊन तांत्रीक मंत्र म्हणत गावभर फिरत होता . त्याच्या पाठोपाठ गावातील लोक चालत होते . तांत्रीक पिंपळाच्या झाडाखाली थांबला . त्याला तिथे शामरावाची आत्मा असल्याचा आभास झाला असावा . तो झाडाकडे बघत जोर जोरात मंत्र म्हणू लागला . जसा जसा मंत्राचा वेग वाढत होता तसतसा लाइटर पकडलेला तांत्रीकचा हात थरथर कापत होता . ५ - १० मिनीटे  न थांबता तो जोरात मंत्र म्हणत होता . मंत्र म्हणता म्हणता अचानक तो शांत झाला आणि लाइटर आपल्या पिशवीत ठेवला आणि म्हणला " आता घाबरण्याची गरज नाही शामरावाची आत्मा लाइटर मधे बंद झालेली आहे . " 

इतका वेळ शांत असलेला सरपंच त्याला म्हणाला " नीट ठेवा तो लाइटर परत बाहेर नाही आली पाहिजे ती आत्मा " .

तांत्रीक म्हणाला " तुम्ही काहीच काळजी करू नका सरपंच साहेब ती आत्मा आता कधीच बाहेर नाही येणार " . 

" मग तो कोण आहे ? " सरपंचाने  समोर बोटाने इशारा केला .

समोर शामराव हातात सिगरेट घेऊन उभा होता . लोक त्याला बघून घाबरले . यावेळी तांत्रीकाला सुद्धा घाम फुटला होता .

" किती भयानक आणि मायावी आहे शामरावाची आत्मा ती बघा आपल्या  मागे पण आहे त्याची आत्मा " सरपंच मागे बघत म्हणाला .

लोकांनी मागे वळून पाहिले तर तिथे पण शामराव होता . आता तर लोक खुपच घाबरले होते त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता . लोकांपेक्षा जास्त तांत्रीक घाबरला होता .

लोकांना घाबरलेले पाहुन सरपंच म्हणाला " घाबरण्याची गरज नाही . इथे आत्मा वगैरे काही नाही . हे दोघे जुळे भाऊ आहे  शामराव आणि भीमराव . "

" मग हा कोण आहे ? " लोकांनी तांत्रीकाकडे बोट करत विचारले .

सरपंच " हा  एक हिर्‍यांचा स्मग्लर आहे . परदेशातून ह्याचे साथीदार  लाइटर मध्ये हिरे लपवून इथे पाठवतात . एका रात्री  पोलिस  याच्या मागे लागले होते म्हणून याने लाइटर खिडकीतून माझ्या घरात फेकून दिला होता . तोच लाइटर घेण्यासाठी हा दुसऱ्या दिवशी तांत्रीकाचा वेष घेऊन माझ्या घरात घुसला होता . पण त्यावेळी तुम्ही याला ढोंगी म्हणून गावातून हाकलून लावला .

 त्याच दिवशी मला तो लाइटर खिडकी जवळ सापडला . तो इतर लाइटर पेक्षा वेगळा होता आणि पेटत पण नव्हता म्हणून मी तो उघडला  त्यात मला हिरे सापडले . मी लगेच पोलिसांना फोन केला . पोलिसांनी मला रात्री घडलेल्या घटणे बद्यल सांगितले . आणि विचारले  "त्या दिवशी कोणी अनोळखी माणूस गावात आला होता का ? "   मी त्यांना सांगितले " एक तांत्रीक माझ्या घरात आला होता पण लोकांनी त्याला ढोंगी समजून हाकलून लावला . "

पोलिसांना माझे बोलणे ऐकून खात्री पटली की  तो स्मग्लरच तांत्रीक बनून माझ्या घरी आला होता . पोलिसांना माहित होते तो लाइटर मधे असलेले हिरे घेण्यासाठी परत नक्की येणार या गावात . मग पोलिसांनी आपले काही गुप्तचर या गावात पाठवले . त्यांनीच या जुळ्या भावांचा पडदा उघड केला . मग काय पोलिसांच्या भितीने या दोघांनी तांत्रीकाची सगळी हकीकत सांगितली . "

तांत्रीकाने खुप चांगला प्लान केला होता ते हिरे परत मिळवण्यासाठी पण त्याला त्याच्या नशीबाने साथ दिली नाही आणि शेवटी तो पोलिसांच्या सापळ्यात अडकला ..

समाप्त

©Sandip Kharuse
  #marathi story

#marathi story #Life

107 Views