ऋतू मनातले(लेख👇)— % & एरव्ही ऋतूंची तक्रार करणारे आपणच असतो.पाऊस पडला नाही तर, थंडी पडलीच नाही तर.या ना त्या कारणाने त्रास हा होतच असतो.ऋतूंनी किती सहन करावं ? पंचाईत होते ऋतूंची, नक्की करावं तरी काय ? बाहेरच्या ऋतूचा त्रास झाला तर घरातली खिडकी बंद केली जाते. पावसाळ्यात पावसाचे थेंब घरी शिरकाव करू लागले की लगेच खिडकी बंद केली जाते.उन्हाळा हा एकच ऋतू आहे ज्यामध्ये घरी हवा खेळती रहावी म्हणून सहसा आपण खिडकी बंद करत नाही. मला वाटतं,प्रत्येक क्षणाला आपल्या मनातही असे ऋतू सुरू असतात.आपल्याला या ऋतूंची आधीच सूचना देणारं हवामान खातं आपल्या मनाकडे नसतं. आपल्या मनात जेव्हा आनंद सरी बरसत असतात तेव्हा पावसाळा ऋतू सुरू असतो.आपल्यातली काही माणसं ही पावसाळा ऋतूचा आव आणणारी असतात.मनामध्ये दुःखाच्या विजा चमकल्या तरीही ही माणसं कुणालाही या विजांचा थांगपत्ता लागू देत नाहीत. अशी माणसं इतरांच्या आयुष्यात आनंद सरींची बरसात करत असतात. आपण दुःखात असतो,एखाद्या विचारात आकंठ बुडालेले असतो तेव्हा मनाची लाहीलाही होत असते , रखरखीत वाटू लागतं.जीव कासावीस होऊन जातो.तेव्हा मनामध्ये उन्हाळा ऋतू असतो. अशावेळी मनाची दारं खिडक्या लावून घेतलेली बरी.कारण या ऋतूची खिल्ली उडवली जाऊ शकते त्यामुळे ही लाहीलाही कधी कमी होईल याची जबाबदारी काळालाच दिलेली बरी. कधीकधी नकळत कुणी आपल्या ह्रदयाला टोचून काही सहज बोलून जातं.तर कधी आपल्याला आगाऊ सूचना न देता आयुष्यातून निघून जातात.हिवाळ्यात जशा पायांना , ओठांना भेगा पडतात अगदी तसंच ह्रदयाला दुःखाने भेगा पडतात..फरक इतकाच क्वचितच कुठली व्यक्ती दुःखाच्या भेगांना भरून काढणारं मॉइश्चरायझर किंवा कोल्ड क्रीमसारखी भेटते.... --प्रेरणा