जाण्याची का झाली घाई तुला राजसा आज काय फायदा करून मी हा शृंगाराचा साज थांब जरासा अजून नाही रात्र संपली राया सुगंध पसरत अजून आहे बघ हा अत्तर फाया खेळे वारा बटांसंगती लपाछपीचा खेळ नजरेत नजर रोखून पहावे अशीच ही वेळ बोटांनी संवाद साधता तनु थरारून जाई लाज वाटते मला राजसा मिठीत अलगद घेई ओठांवरती ओठ ठेवुनी टिपून मध तो घेऊ स्वप्नांमधल्या वाटांवरती धुंद होउनी जाऊ काजळभरल्या डोळ्यांमध्ये पहा प्रेम तू माझे छेडित तारा श्वासांमधुनी अपुल्या वीणा वाजे शुक्राची बघ दिसे चांदणी पूर्व दिशेला आता अलगद चुंबन भाळावरती देई जाता जाता डोळ्यांपुढूनि निघून जा वळूनही ना बघता समजुत घाले मनाचीच मन नयनी अश्रू गळता पुन्हा भेट व्हायची कशी अन केव्हा ठाउक नाही देत दिलासा मनास काही वाट तुझी मी पाही फिरून नाही परतुन आला साजण माझा दारी कर्तव्याच्या रणांगणावर कामी आली स्वारी दुःख उराशी जपून ठेविन तुझ्या स्मृतींना जपता तुझे नाव ओठांवर येइल सदैव उठता बसता नको सोबती आता कुठल्या संसाराचा घाट जन्मोजन्मी तुझीच वेड्या पाहिन मी रे वाट -- १९/१२/२०२२ २३:३५ ©उमा जोशी #लवंगलता #८_८_८_४