‘आपण इथून आता सात पावलं चालू. आशिर्वाद द्यायला ही आपली नवी वास्तू आहे. पावलागणिक ती ‘तथास्तु’ म्हणत राहील. तुझ्या दादांची साधना तुझ्या पाठीशी आहे. मरताना दिलेला बाबांचा आशिर्वाद मलाही सावरील. मी आस्तिक आहे की नास्तिक ह्याचा मी कधी शोध घेतलेला नाही. मी श्रध्दावंत मात्र जरूर आहे. सौंदर्य, संगीत, सुगंध, साहित्य ह्या सर्वांसाठी मी बेभान होतो. पण माझी जमीन कधी सुटत नाही. मी माणूस आहे ह्याचा मला अभिमान वाटतो. मला परमेश्वर व्हायचं नाही. नवर्याआला देव वैगरे मानणार्यापैकी तू आहेस की नाहीस हे मी परिचय होऊनही विचारलं नाही. तशी नसलीस तर उत्तमच. पण असलीस तर इतकचं सांगेन, की मला देव मानायचा प्रयत्न केलास तर तो माझ्यावर फार मोठा अन्याय होईल. मला माणूसच मान म्हणजे कळत नकळत होणारे अपराध क्षम्य ठरतील. कुणाचही मन न दुखवणं हीच मी देवपूजा मानतो. जिवात जीव असेतोवर मी तुला सांभाळीन. आता सांभाळीन हा शब्द चुकीचा आहे. त्यात अंहकार डोकावतो. तेव्हा इतकचं सांगेन की आपल्या ह्या घरात, संसारात, तू चिंतेत असताना मी मजेत आहे असं कधी घडणार नाही आणि शेवटचं सांगायचं म्हणजे मला पत्नी हवीच होती. मात्र पत्नी झाल्यावर तुझ्यातली प्रेयसी सांभाळ. मला सखी हवीच आहे. होशील? ’ .....Mayu