Nojoto: Largest Storytelling Platform
sanchitagaddamwa6356
  • 74Stories
  • 10Followers
  • 777Love
    179Views

sanchita gaddamwar

  • Popular
  • Latest
  • Video
479f236a20c5b69aa2af41e4768d1606

sanchita gaddamwar

धडपडतो अन् तरी शोधतो
सुख अडगळीत आयुष्याच्या
भंगल्या स्वप्नांत जगतो,
छटा‌ लपवूनी नैराश्याच्या
                            एक एक स्वप्न तयांतील
                            सांगतो कधी हसऱ्या कथा
                            कधी मधेच हसता हसता
                            जातो बोलूनी साऱ्या व्यथा
चटके सारे आयुष्याचे
हसता हसता सहज सोसतो
भंगल्या स्वप्नांतूनी मी
शहाणपण आज वेचतो 
                           पसाऱ्यातूनी आयुष्याच्या
                           वाट शोधतो मी सुखाची
                           दु:खांच्या या काळोखातून
                           किरण शोधतो नवी उद्याची 
थकला जरी हा जीव माझा
ओवाळून टाकतो कुणावर
जाती निघूनी ते ही क्षणात
घाव देवूनी खोल मनावर
                           दिले जरी आयुष्य तयांना
                           तरी न पाहती मागे वळूनी
                           निघूनी जाती असेच अलगद
                           खेळ भावनांसवे खेळूनी
सोडूनी जाती तरी जीव हा
तयांसाठी उगाच झुरतो
आठवणींचा पसाराच मग
एकाकी या मनात उरतो 

                       - संचिता नितीन गड्डमवार

©sanchita gaddamwar #Parchhai
479f236a20c5b69aa2af41e4768d1606

sanchita gaddamwar

बाप्पा ही कसली रे रीत? एक दिवस मोठ्या आनंदाने थाटामाटात आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन यायचं, तुझे सगळे लाड करायचे, तुझ्या आवडीचा खाऊ करून तुला मोठ्या मायेनं खाऊ घालायचं, भक्तीभावाने तुझी पुजा आरती करायची आणि एवढा जीव लावून एक दिवस तुला निरोप द्यायचा!
या दहा दिवसांत हवी तेवढी मौज करता करता नकळत विसरच पडतो की तू आलायस तो काही कायमचा नाही! या उत्साहात हे दहा दिवस कसे सरतात काही कळतच नाही.
             पण ए बाप्पा, तुला खरं सांगू? मी मोठी तर झाले पण तुला निरोप देण्याची वेळ आली की  जीवाची होणारी घालमेल अजूनही तीच आहे. अजूनही तुझी शेवटची आरती करताना कंठ दाटून येतोच. बालपणी किती बरं होतं, नाही? "माझ्या देवबाप्पाला नका ना हो नेऊ " म्हणत रडून रडून घर डोक्यावर घ्यायचे, तुला बिलगून "देवबाप्पा, थांब ना रे. नको ना जाऊस" म्हणत हट्ट करायचा.
 हो, हे आहेच की कितीही रडले तरी तू थांबत नव्हतासच; पण निदान तुला बिलगून रडून घेतलं की मन मोकळं होत होतं. 
                पण आता, आता मात्र तसं  करता येत नाही. आता तुझी शेवटची आरती करताना दाटून आलेला कंठ रडून मोकळा करता येत नाही. डोळ्यांत आलेले अश्रू पापण्यांची उघडझाप करून गुपचूप आत ढकलावे लागतात. फुटलेला हुंदका ढोल ताशांच्या गजरात दडवावा लागतो. मग मन स्वतःच स्वतःला समजावतं की 'बाप्पा चाललाय तो परत येण्यासाठीच!' आणि मग काय, हसतमुखाने सगळं विसरून वाजतगाजत, जयघोष करत निघते माझ्या लाडक्या बाप्पाची मिरवणुक. नाचत नाचत मिरवणुक पाण्यापर्यंत जाते खरी, पण ती तुझी गोंडस-गोजिरवाणी मुर्ती नजरेआड करायला मन मानत नाही रे अजूनही. आजही तुझं विसर्जन करताना अश्रू पापण्यांचे बांध ओलांडून येतातच गालावर, आणि निरोप देताना आजही मन तुला तेच लडिवाळ आर्जव करत, "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!".  
                                                                      
                                            - संचिता नितीन गड्डमवार ✍️

©sanchita gaddamwar
479f236a20c5b69aa2af41e4768d1606

sanchita gaddamwar

बाप सेवानिवृत्त झाला आणि त्याच संध्याकाळी सून व मुलाने घराच्या दारावरील त्याच्या नावाची पाटी काढून स्वतःच्या नावाची पाटी लावली; तेव्हा खरी निवृत्तीची बोचरी जाणीव त्या बापाला झाली.

-काव्यांचिता✨✍️

©sanchita gaddamwar
479f236a20c5b69aa2af41e4768d1606

sanchita gaddamwar

फुलल्या जाई जुईचा सुवास विठ्ठल
ध्यास विठ्ठल अन् श्वासही विठ्ठल ||धृ||

मनीची माझिया निरागस भक्ती
उरीची जीवन जगायाची शक्ती
भोळी दर्शनाची आसही विठ्ठल ||१||

सवंगडी माझा आणिक माझा सखा
धावोनी संकटी येई पाठीराखा
तनी आत्म्याचा वासही विठ्ठल ||२||

माझी माऊली अन् माझा बाप
सुख अंतरीचे माझिया अमाप
जगी ममतेचा सहवासही विठ्ठल ||३||

जग सारं खोटं तोच एक सत्य
नित्य वाहते मी चरणी अगत्य
माझ्यावरी माझा विश्वासही विठ्ठल ||४||

     ✍🏻:- संचिता गड्डमवार

©sanchita gaddamwar
479f236a20c5b69aa2af41e4768d1606

sanchita gaddamwar

बापाच्या सदऱ्याची वाढती भोकं जाणीव करून देतात की लेकराने आता कामाला लागलं पाहिजे. त्याच्या चेहऱ्यावरील वाढत्या सुरकुत्या सांगतात की तो दमलाय कुठेतरी आतल्याआत. त्याचे म्हातारे खांदे दुखून सांगतात की संसाराचा गाडा खेचून खेचून त्याच्या शरीरातील त्राण आता पार आटू पाहतोय. चार पावलं चालताच वाढणारा त्याचा श्वास मोठ्या आशेने लेकराच्या आधाराची वाट पाहत असतो.
               मग आपल्याला जन्मापासून अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या, आपल्या एका एका घासाची सोय करणाऱ्या, चालायला, बोलायला एवढेच नव्हे तर जगायला शिकवणाऱ्या आपल्या जन्मदात्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याची काठी बनून त्याला आधार देणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य नाही का? जर तो बाप त्याच्या कर्तव्यांना आयुष्यभर कधीच चुकला नाही तर आज त्याच्या उतार वयात त्याला आधार द्यायला आपण का चुकतो?

                        - संचिता नितीन गड्डमवार ✍️

©sanchita gaddamwar #FathersDay
479f236a20c5b69aa2af41e4768d1606

sanchita gaddamwar

लहानगा विनू मंदिरात गेला आणि रागाने गणेशाला म्हणाला, "बाप्पा, आजी म्हणते देवालाही लाड हवे असतात; म्हणून काय तू माझी आई चोरावीस?"

 - काव्यांचिता ✨

©sanchita gaddamwar
479f236a20c5b69aa2af41e4768d1606

sanchita gaddamwar

बागेत झाडाखाली बसून ते दोघे भांडत होते. 'तुला माझी काळजीच नाही' असे बोलून ती दूर जाऊन उभी राहिली आणि उन्हाने तिचे पाय भिजतील म्हणून तिच्या चपला हातात घेऊन तो तिच्या मागोमाग गेला.

- काव्यांचिता ✨

©sanchita gaddamwar
479f236a20c5b69aa2af41e4768d1606

sanchita gaddamwar

अंगातील सगळी शक्ती एकवटून मास्तरांनी डोळे उघडले पण त्यांना परदेशात राहणारा त्यांचा मुलगा आलेला दिसला नाही. जमलेल्या गर्दीवरून त्यांनी एकदा नजर फिरवली; सर्व विद्यार्थ्यांचे डोळे आसवांनी गच्च भरून वाहत होते. मास्तरांनी त्यांच्याकडे मायेने शेवटचे पाहिले आणि समाधानाने प्राण सोडला. 

- काव्यांचिता ✨

©sanchita gaddamwar
479f236a20c5b69aa2af41e4768d1606

sanchita gaddamwar

पार्टीसाठी पैसे अपुरे पडतील म्हणून शामने बाबांना परीक्षा फीचे कारण सांगून पैसे मागितले आणि बाबांनी लगेच फाटक्या शर्टाच्या खिशातून पैसे काढून त्याला दिले.

- काव्यांचिता ✨

©sanchita gaddamwar
479f236a20c5b69aa2af41e4768d1606

sanchita gaddamwar

परत जाताना आजीने मोठ्या मायेने लाखभर पगार असलेल्या सईच्या हातात दोनशे रुपये ठेवले आणि मुका घेऊन बोबड्या बोलाने म्हणाली "आवडीचा खाऊ घे हो बयो"

- काव्यांचिता ✨

©sanchita gaddamwar
loader
Home
Explore
Events
Notification
Profile