Nojoto: Largest Storytelling Platform

White पाऊस💦💦 उगाच रिते का मन हे आतुर वर्षा आगमन

White पाऊस💦💦

उगाच रिते का मन हे आतुर
वर्षा आगमनाची लागे हुरहूर.....
पाऊस येता अवखळ, अल्लड
तृप्त झाले मन हे चंचल....

वलयांकित नक्षीच्या रेखा 
उमटून गेल्या जळात पळभर....
वृक्षवेलींवर पाचूंची उधळण
अन् इंद्रधनुचे त्यावर कोंदण....

बिंदू अनामिक बुजरे क्षणभर
प्रवाहात ओघळती
जळात उमटले गगनाचे प्रतिबिंब
धरेच्या मिलनासाठी....

उंच तरुवर भिजूनी पक्षी
निवांत क्षण वेचती....
मध्येच फडफड, भिरभिर करिती
थेंब शिंपण्यासाठी....

उभ्या उभ्या सरींचा जणू
आरव घुमतो कानी
सप्तसुरांची मैफल जमते
नक्षत्रांच्या अंगणी....

ओल्या ओल्या मातीचा
गंध भरतो अंतरी
जणू कोमेजल्या मनाला 
लाभावी संजीवनी....

उमलून येई भाव मनीचे
जलधारा पाहताक्षणी
उमटून जाती अविरत शब्दांचे
काव्य लेखणीतूनी
काव्य लेखणीतूनी।।

अमिता🖋️

©Amita
  #पाऊस