Nojoto: Largest Storytelling Platform

Best अनलज्वाला Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अनलज्वाला Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 6 Stories

उमा जोशी

रोज सकाळी तुझी आठवण येते आई

निघून जाण्याची अंमळ तू केली घाई

सहवास तुझा अजून वाटे हवाहवासा

तुझ्या विना गे एकाकी मी पडले बाई


सुखदुःखाच्या सगळ्या गोष्टी तुला सांगणे

निरागस जणू होते माझे असे वागणे

मला आवडे ऐकण्यातली एकतानता

आणि तल्लीन सांगण्यातले माझे होणे


उत्तर नव्हते तुझ्याकडे सगळ्या प्रश्नांचे

तरी कधी ना टाळलेस तू ऐकायाचे

सांगून तुला सारे काही मी निश्चीन्त

हलके हलके संवादातुन वाटायाचे


आज पुन्हा उद्विग्न असे मन पण तू नाही

मी एकाकी सोबत माझ्या कोणी नाही

सांगशील तू काय? आठवत बसले आहे

अनेक मिळती पर्याय मला पण सुचे न काही


किती सावरू तरी नावरे मनातले कढ

ठरे भावना इथे बये बुद्धीच्या वरचढ

क्षणाक्षणाला प्रसंग मोठे उभे ठाकती

तुला स्मरूनी चालत आहे वाटा अवघड

©उमा जोशी #navratri  #आई #अनलज्वाला

उमा जोशी

दिसती अनेक रुपे भुकेची सभोवताली
कुणा भाकरी तर कोणाला दौलत प्यारी
हाव लागली आहे पैसा कमावण्याची
इथल्या जगण्याची ही रीतच आहे न्यारी

वणवण करतो तिचा जीव हो कामासाठी
झोपडीत त्या माऊलीला करमत नाही
काही दिडक्या पडती हाती कामानंतर
तिच्या पिलांना अन्न पोटभर मिळतच नाही

दुसरी माता टाकुन देते उरले सुरले
तिची मुले ही नाही खातच भाजी पोळी
रोज हवे असते त्यांना ते पिझ्झा बर्गर
आहे बापाची पैशाने भरली झोळी

दिसून येतो फरक कसा हा एका शहरी
भूक कुणाला तर कोणाला अजीर्ण छळते
मिळण्यासाठी अन्न दूरवरी एक चालतो 
तर दुसऱ्याची खूप चालुनी चरबी जळते

शांत झोप लागू दे बाळा रे भगवंता
पुसुन टाक तू या भूकेची कर्मकहाणी
रिकाम पोटी निजावयाची नकोच सक्ती 
नको कुणा आईच्या देऊ डोळा पाणी

---२६/०३/२०२३ @२०।००

©उमा जोशी #भूक #अनलज्वाला #(८/८/८)

उमा जोशी

शाळा सुटता ओढ लागते घरी जायची
खाऊ कुठला असेल केला हे पहायची
दाणे लाडू चिवडा किंवा शेव चुरमुरे
गोड लागते सारे तेव्हा भूक असायची

खाऊ झाल्यानंतर सारे खेळायाचे
अंधार पडेतो कोणी नाही पुसायचे
लंगडि खो-खो लपंडाव की पकडापकडी
सगळे खेळत कोणी नाही भांडायाचे

संध्याकाळी देवापुढती शांत बसावे
शुभंकरोती स्तोत्रे सारी पाठ म्हणावे
मदत करावी जेवणात मग आईलाही
त्याच्यापूर्वी अभ्यासाला जरा बसावे

जेवण होता थोर माणसे गप्पा करिती
आजीपुढती गोष्ट ऐकण्या छोटी जमती
गोष्ट ऐकता डोळ्यांमध्ये झोप उतरते
रात्र वाढता निवांत सारी झोपी जाती

रम्य बालपण सरते सगळे कसे कळेना
आयुष्याच्या सुखदुःखाचा मेळ बसेना
बालमित्र येतात भेटण्या अवचित केव्हा
डोळ्यांपुढून बालपणीचा काळ सरेना
२१/११/२०२२ @ १४:३५

©उमा जोशी #रम्य_बालपण #अनलज्वाला #८_८_८

उमा जोशी

मावळतीला जाता दिनकर सांज उतरते
गर्द होतसे अंधार आणि रात्र पसरते
लुकलुक करती नभी तारका चंद्र हासतो
अलगद शीतल वाऱ्याची ती झुळुक येते

झाडे वेली निजल्या असती नदीकिनारी
वाळूवरती चंद्र चांदणे मोहक पसरी
हळूच चुंबन काठाचे त्या लाटा घेती
नभी चांदणी शुक्राची ती हसे लाजरी

अशीच अलगद सरेल रजनी पहाटवेळी
दिसू लागता सूर्यकिरणांची प्रभा आगळी
जगास साऱ्या जाग येईल पुन्हा नव्याने
मुले माणसे कामात व्यग्र असती सगळी

वाट पाहते धरा तरीही ती रात्रीची
अशी असे ही प्रीत आगळी शशी धरेची
नित्य भेटती एकमेकांस दोघे रात्री  
यांच्या सम ती नसे प्रीत हो जगी कुणाची
 ---- उमा जोशी २०/०३/२०२१

©उमाच्या मनातलं #गोदातीर्थ #अनलज्वाला #शशीधराप्रीत

#moonlight

उमा जोशी

आयुष्याची शाळा मोठी अवघड आहे
अनुभूतीचा शिक्षक मोठा जालिम आहे

रोज उत्तरे वेगवेगळी मागे बाई
न संपणारा सराव इथला कठीण आहे

बघून लिहिण्या दुसऱ्याचे ती मुभाच नाही
प्रत्येकाचा पेपर इथला स्वतंत्र आहे

पडलो झडलो तरी न कोणा चिंता कसली
जो तो येथे गर्क आपल्या धुंदित आहे

निकाल केव्हा असे आपला माहित नाही
जरी परीक्षा क्षणोक्षणीची रोजच आहे

मृत्यूद्वारी हिशोब होतो चोख सर्वथा
जमा खर्च तो कर्मफलाचा समान आहे

----उमा जोशी १७/०३/२०२१

©उमाच्या मनातलं #गोदातीर्थ #कर्मफल #अनलज्वाला 

#colours

उमा जोशी

रंग केशरी सांज ल्यायली कातरवेळी
तुझी आठवण येते मजला संध्याकाळी
दिली घेतली कितीक वचने दोघांनीही
कसे संपले सारे काही असे अवेळी

तुटले नाते कसे अचानक कळले नाही
जाता जाता निघून कोणी वळले नाही
कसला रुसवा राग कोणता होता तेव्हा
परंतु ओठी शब्द आपल्या आले नाही

असे जरी हा करार झाला न लिहीलेला
ऐक सांगते प्रसंग मजला आठवलेला
निरोप घेता डोळा पाणी दोघांच्याही
रुतून बसला मनात तो क्षण अवघडलेला

काय असे हे झाले आहे मला कळेना
अडकुन राही मनी हुंदका प्रश्न सुटेना
हाक दे मला सख्या कधीही मनापासुनी
तुझ्याविना रे माझा सखया जीव रमेना

©उमा जोशी १७/०३/२०२१

©उमाच्या मनातलं #गोदातीर्थ #अनलज्वाला #तुझ्याविना


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile